डॉ.पूनावाला स्कूलतर्फे भव्य आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

 


पेठ वडगाव : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी, नाविन्यपूर्णता आणि संशोधन वृत्ती विकसित व्हावी या उद्देशाने डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक शाळा सहभागी होणार असून विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.


या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनाची मध्यवर्ती थीम आहे – “Innovations for Life and Environment” (जीवन आणि पर्यावरणासाठी नवकल्पना). या थीमनुसार विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण प्रकल्प, कार्यरत व न कार्यरत मॉडेल्स तसेच सादरीकरणे प्रदर्शित केली जाणार आहेत.

विशेष भर पर्यावरण संवर्धन, आरोग्य व पोषण, हवामान बदल उपाय, ‘वेस्ट टू वेल्थ’ आणि गणितीय मॉडेलिंग यांसारख्या महत्त्वाच्या उपविषयांवर असणार आहे. प्रत्येक कक्षामध्ये विशेष प्रबोधनपर जनजागृती कार्यक्रम, थीमआधारित शैक्षणिक प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांचे सृजनशील उपक्रम सादर केले जातील.

शाळेतील विज्ञान व गणित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आपले प्रकल्प सादर करतील. प्रदर्शनासोबतच पाहुण्यांसाठी वैज्ञानिक जनजागृती कार्यक्रम, पर्यावरण विषयक जागृती पोस्टर्स व सर्जनशील उपक्रमांचे विशेष दालन उभारले जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ वैज्ञानिक दृष्टीच नव्हे तर सामाजिक जबाबदारीची जाणीवही विकसित होईल, असे आयोजकांचे मत आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९:४५ वाजता उद्घाटन सोहळ्याने होणार असून दिवसभर विविध गटांचे सादरीकरणे व स्पर्धा पार पडतील. प्रदर्शनानंतर लगेचच समारोप व पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे. विजेत्या शाळांना आकर्षक रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे व ट्रॉफीज प्रदान केल्या जाणार आहेत.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभेला वाव मिळणार असून विज्ञानाविषयी उत्सुकता, नाविन्यपूर्णता आणि प्रयोगशील वृत्ती अधिकाधिक दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.