उदगिरी शुगरच्या आकराव्या गळित हंगामाचा बॉयलर प्रदिपन संपन्न
विटा
मौजे बामणी (पारे), ता. खानापूर, जि.सांगली येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन 2023-24 या आकराव्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदिपन समारंभ शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर, 2023 रोजी कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार व सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वनश्री मोहनराव कदम यांच्या शुभहस्ते व संस्थापक डॉ.शिवाजीराव कदमसर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. श्री सत्यनाराण पुजा कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल शिवाजीराव कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. देवयानी कदम यांचे शुभहस्ते करण्यात आली.
कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात कारखाना, सहवीज निर्मिती व आसवणी प्रकल्पाचे ऑफ सिझनमधील कामे पूर्ण झालेली असून ऊस तोडणी व वाहतुकी करिता पुरेशी यंत्रणाही भरली असल्याची माहिती दिली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल कदम यांनी यावेळी कारखाना दररोज 5 हजार मे.टनाने ऊस गाळप करणार असल्याचे सांगीतले. त्याच प्रमाणे इथेनॉल करिता असलेली मागणी विचारात घेता इथेनॉल प्रकल्पाची क्षमता 1 लाख 70 हजार लिटर्स करणेत आली असून त्याचे उभारणीचे काम अंतीम टप्प्यात असून ऑफ सिझनमध्ये डिस्टिलरी जादा दिवस चालविणेत येणार असल्याचे सांगीतले. त्याच प्रमाणे ऊस गाळीत केल्या नंतर रसातील पाणी बाजूला काढून त्याचे पुनर्वापर करणेत येणार आहे. या मुळे दैनंदिन पाणी वापर कमी होणार असल्याचे सांगीतले.
यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक डॉ.शिवाजीराव कदमसर यांनी येणाऱ्या गळीत हंगामामध्ये जास्तीत जास्त ऊस उदगिरी कारखान्यास देणाऱ्या पहिल्या पाच शेतकऱ्यांना अनुक्रमे 51 हजार, 40 हजार, 30 हजार, 20 हजार व 10 हजार असे बक्षीस देवून जाहीर सत्कार करणार असल्याचे जाहीर केले. तसेच कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस उदगिरी कारखान्यास गळीतासाठी पाठवावे असे आवाहनही डॉ.शिवाजीराव कदम यांनी केले.
यावेळी डॉ. हणमंतराव कदम. विजय कदम, ॲड. सुशांत कदम, सोनहिरा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन निवृत्तीदाजी जगदाळे, संचालक सयाजी धनवडे, कराडचे आबासाहेब चव्हाण, तडसरचे दिलीपराव पाटील, वांगीचे बाबा सुर्यवंशी, पैलवान दादा सुर्यवंशी, दुधोंडीचे जे.के.बापू जाधव, खेराडे विटाचे आ.एम.पाटीलसर, आनंदाराव साळुंखे, मंगरुळचे आनंदराव पाटील, बामणीचे अभिजित शिंदे, भरत लेंगरे, महाविर शिंदे, बाजीरावनाना शिंदे, विटाचे सुरेश पाटील, शरद शहा यांचेसह कडेगांव, पलुस व खानापूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी मानले तर सुत्र संचालन प्रशासकीय अधिकारी बशीर संदे यांनी केले.
